कल्याण दि.30 मे :
राज्यातील इतर शहरांमध्ये ज्याप्रमाणे दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्याप्रमाणे कल्याण पश्चिमेच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक ते कल्याण स्टेशन परिसरात असणारी दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्याची मागणी व्यापाऱ्यांनी महापालिकेकडे केली आहे. माजी महापौर राजेंद्र देवळेकर आणि नगरसेवक गणेश जाधव यांच्या पुढाकाराने व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने नुकतीच महापौर विनिता राणे आणि पालिका आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांची भेट घेतली.
महाराष्ट्रात मुलुंड, पुणे, नगर, नागपूर आदी शहरांमध्ये दुकानं सुरू करण्यास प्रशासनाने परवानगी दिली आहे. कल्याण स्टेशन आणि आसपासचा परिसर हा ना प्रतिबंधित क्षेत्रात येत असल्याने इथल्या व्यापाऱ्यांनी महापालिकेकडे आपापली दुकाने सुरू करण्याची परवानगी मागितली आहे.
तसेच महापालिकेने परवानगी दिल्यास सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायजेशन आदी नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आश्वासनही व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने दिले आहे. यामध्ये हरीश खंडेलवाल, अनंत(राजू) गवळी, निलेश जैन , विनायक ठाकरे, किरण चौधरी, मनोज जैन, मनोज अग्रवाल, पिंटू पटेल, रवी जैन, हरीश शेट्टी, अशोक जैन, श्रीपाल जैन , राजू कदम, धनंजय खांगटे , मनोहर मुंदडा , संजू अग्रवाल आदी व्यापारी बंधू उपस्थित होते.