कल्याण दि.8 जून :
आधारवाडी जेलमधील कर्मचाऱ्यांना केंद्रीय आयुष मंत्रालयाने शिफारस केलेल्या आर्सेनिक अल्बम 30 या गोळ्यांचे माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आले. तर कैद्यांनाही तातडीने गोळ्या वाटप करण्यात येणार आहेत. दरम्यान कोरोना योद्धे म्हणून कर्तव्य बजावत असताना कोरोनाबाधित झालेले पोलीस शिपाई राजू लोखंडे हे उपचार करून सुखरूप घरी आले आहेत. त्यांचीही माजी आमदार नरेंद्र पवार यांनी घरी जाऊन विचारपूस केली.
कल्याण शहरातील वाढत्या कोरोना रुग्णांचा आकडा पाहता कोळीवली – गांधारी परिसरात भाजपा उद्योग आघाडीचे शहराध्यक्ष संजय कारभारी यांच्या वतीने विविध उपाययोजना केल्या जात आहेत. माजी आमदार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण शहरात 1 लाख नागरिकांना आर्सेनिक अल्बम 30 या गोळ्या वाटप करण्यात येत आहेत. कोळीवली गाव व ऋतू रिव्हरसाईड या सोसायटीमध्येही त्याचे वाटप आज संपन्न झाले. कोरोना रुग्ण आढळून आलेल्या लोढा गार्डन या सोसायटीच्या परिसराचीही पाहणी केली व कचरा, गटार साफसफाई नसल्याने तातडीने सर्व स्वच्छता करण्याच्या सूचना श्री. पवार संबंधित विभागाला दिल्या आहेत. सोबतच गोल्डन ओक सोसायटीच्या मागे न्यू अंजनेय सोसायटीच्या समोर नागरिकांना विजेची समस्या सातत्याने असते. त्याठिकाणीही नागरिकांची भेट घेऊन तातडीने समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. नागरिकांनी कोरोना मुक्त कल्याणसाठी काळजी घेतली पाहिजे, आवश्यकता असेल तरच घराच्या बाहेर पडा अशी विनंती दरम्यान बोलताना नरेंद्र पवार यांनी केली. संजय कारभारी हे गेली तीन महिने सक्रियपणे परिसरातील नागरिकांसाठी काम करत असून त्यांचे काम कौतुकास्पद असल्याचेही नरेंद्र पवार बोलताना म्हणाले.
यावेळी मेघनाथ भंडारी, ज्योती शर्मा, श्रवण कारभारी, संदीप बोबडे, कृष्णा कपूर, रोशन कारभारी आदी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.