कल्याण दि.13 जून :
एकाच दिवसात 160 (13 जून 2020) आणि 185 (12 जून 2020) एवढ्या मोठ्या संख्येने कोरोनाग्रस्त आढळल्यानंतर आता महापालिका प्रशासनाने कल्याण डोंबिवलीच्या काही क्षेत्रात कडक निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी कल्याण पश्चिमेच्या ‘क’ प्रभाग क्षेत्रातील पुढील परिसर हे कंटेनमेंट क्षेत्र (प्रतिबंधीत क्षेत्र) म्हणून घोषित केला आहे.
या कंटेनमेंट क्षेत्राच्या हद्दीमध्ये कोणत्याही प्रकारच्या प्रवासी वाहतूक आणि नागरिकांच्या येण्या-जाण्यावर प्रतिबंध घालण्यात आला असून यामधून अत्यावश्यक सेवेतील वाहने आणि व्यक्तींना सूट देण्यात आल्याचे महापालिकेतर्फे सांगण्यात आले आहे.
प्रतिबंधित क्षेत्रांची नावे/तपशील…
*’क’ प्रभाग क्षेत्रातील (कल्याण प.)*
“मौलवी कंपाऊंड, रोहिदास वाडा, अन्सारी चौक, मोहल्यातील मच्छीबाजार, आंबेडकर रोड, रेतीबंदर परिसर, टेकडी कब्रस्तान, दुधनाका.”
या प्रतिबंधीत क्षेत्रामध्ये “मेडीकल स्टोअर्स, रूग्णालये/क्लिनिक, एलपीजी गॅस सिंलेडर पुरवठा” या आस्थापनांना हे निर्बंध लागू राहणार नाही. तसेच या प्रतिबंधित क्षेत्रामध्ये सकाळी ९.०० ते सायंकाळी ५.०० या कालावधीत बेकरी, दुग्धजन्य दुकाने (डेअरी), किराणा दुकाने, भाजीपाला इ. दुकाने वगळता अन्य सर्व व्यावसायिक आस्थापना/ दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच या प्रतिबंधित क्षेत्राच्या हद्दीत कोणत्याही प्रकारची प्रवासी वाहतूक आणि नागरिकांच्या येण्या-जाण्यावर प्रतिबंध करण्यात येत असून यामधून केवळ अत्यावश्यक सेवेतील वाहने आणि व्यक्तींना सूट देण्यात येत आहे.
तर दूधनाका परिसरातील दूध विक्री ही सकाळी ६.०० ते ८.०० आणि दुपारी ३.०० ते ५.०० या कालावधीत करण्यासाठी परवानगी देण्यात येत आहे. परंतू याठिकाणी बाहेरील व्यक्तींना दुध खरेदी करण्यावरही प्रतिबंध करण्यात आला आहे.
या परिसराच्या सीमांचे नियमन (Perimeter control) अत्यंत काटेकोरपणे करणेबाबत , संबंधित प्रभागक्षेत्र अधिकारी आणि संबंधित पोलीस अधिकारी यांनी योग्य ती कार्यवाही करण्याबाबतच्या सूचनाही देण्यात आल्या आहे. तसेच याव्यतिरिक्त प्रतिबंधीत क्षेत्रासाठी यापूर्वी वेळोवेळी काढलेल्या आदेशानुसार लादलेले निर्बंध योग्य त्या फेरफारासह लागू राहतील असेही महापालिका आयुक्तांनी काढलेल्या या आदेशात नमूद करण्यात आले आहे.