कल्याण दि.11 जून :
कल्याणातील एका व्यक्तीच्या कोरोना टेस्ट अहवालाबाबत कल्याण डोंबिवली महापालिकेने थायरोकेअर या खासगी लॅबला नोटीस बजावली आहे. महापालिका आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनी एलएनएनला ही माहिती दिली.
कल्याणच्या शहाड परिसरात राहणारे शरद पाटील घरात पडल्याने शरद पाटील यांचा हात फ्रॅक्चर झाला होता. मात्र हाताला प्लास्टर घालण्यापूर्वी शासनाच्या नियमानुसार करण्यात आलेल्या कोरोना चाचणीत त्यांचा अहवाल पॉजिटीव्ह आला. मात्र लॉकडाऊनच्या काळात घराबाहेरही न पडलेल्या शरद पाटील यांच्यासह कुटुंबियांना त्यामुळे जबर धक्का बसला. तरी आलेल्या अहवालानुसार पालिका कर्मचाऱ्यांच्या सल्ल्याने ते कल्याणात हॉलीक्रॉस रुग्णालयात दाखल झाले. मात्र त्यांच्या मनात या कोरोना अहवलाबाबत साशंकता होती. त्यामूळे त्यांनी दुसऱ्या लॅबमधून आणखी एकदा करोना टेस्ट करून घेतली. आणि विशेष म्हणजे या कोरोना चाचणीचा अहवाल निगेटीव्ह आल्याने पाटील यांना तिसऱ्या दिवशी रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले.
मात्र थायरोकेअर लॅबने दिलेल्या अहवालामुळे झालेला मनस्ताप आणि आर्थिक नुकसानाबद्दल या लॅबवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. याबाबत त्यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांच्याकडेही तक्रार करत लॅबवर कारवाईची मागणी केली आहे. असेच प्रकार ठाणे महापालिका क्षेत्रातही घडल्याचे समोर आल्याने ठाणे महापालिकेने या लॅबवर बंदी घातली आहे. तशीच कल्याण डोंबिवली महापालिकेनेही कारवाई करण्याची मागणी पाटील यांनी केली आहे.
दरम्यान याबाबत महापालिका आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी आणि पालिकेच्या आरोग्य विभागातील साथरोग प्रमुख प्रतिभा पानपाटील यांच्याशी संपर्क साधला असता घडलेल्या प्रकाराबाबत या लॅबला आम्ही नोटीस धाडल्याचे सांगण्यात आले.