कल्याण दि.8 जून :
राज्य शासनाच्या ‘मिशन बिगीन अगेन’अंतर्गत कल्याण डोंबिवलीत दुसऱ्या टप्प्यात सर्व दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र कल्याण पश्चिमेतील झुंजारराव मार्केटमधील दुकानं सुरू करण्यावर अद्यापही निर्बंध असल्याने इतरांप्रमाणे आम्हालाही दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्याची मागणी इथल्या दुकानदारांनी केली आहे.
5 जूनपासून मिशन बिगीन अगेनच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये सम-विषम किंवा पी1-पी2 नूसार कल्याण डोंबिवलीत दुकाने उघडण्यात आली आहेत. या दुकानांसाठी आवश्यक असणारी नियमावलीही महापालिका प्रशासनाने जारी केली असून त्यानुसार आता दुकानांमधील व्यवहार सुरू झाले आहेत. मात्र कल्याण पश्चिमेतील सर्वात जुन्या अशा झुंजारराव मार्केटमधील दुकाने उघडण्यावर निर्बंध घालण्यात आल्याने दुकानदारांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच इतरांप्रमाणे आम्हीदेखील शासनाला सर्व प्रकारचे कर देयके अदा करत आहोत. कोरोनामूळे आधीच आमच्या व्यवसायाचे आर्थिक नुकसान झाले असून आमचे पार कंबरडे मोडले आहे. अशा कठीण काळात आम्ही जगायचे कसे? असा आर्त सवाल करत या दुकानदारांनी इतरांप्रमाणे आमची दुकानही सुरू करण्यास परवानगी देण्याची मागणी केली आहे. याबाबाबत त्यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांच्याशीही ईमेलद्वारे पत्रव्यवहार करत दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्याची विनंती केली आहे.
दरम्यान महापालिका आयुक्तांनी 2 जून रोजी मिशन बिगीन अगेन अंर्तगत काढलेल्या नव्या आदेशांमध्ये 5 जूनपासून सर्व मार्केट आणि दुकाने सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतरही मग झुंजारराव मार्केटमधील दुकाने सुरू करण्यास परवानगी का।दिली जात नाहीये असा प्रश्न निर्माण झाला आहे.